राज ठाकरेचं माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

मुंबई : राज ठाकरे यांच्या आदेशानुसारच माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हल्ल्या मागचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या संदर्भात पोलिसात केलेल्या तक्रारीत देखील त्यांनी राज ठाकरे यांचे नाव घेतले आहे. माझी राज ठाकरेंवर बोलण्याची औकात नसेल तर राज ठाकरेंची तरी अजित पवारांवर बोलण्याची औकात आहे का? असा प्रश्नही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
मिटकरींचा गंभीर आरोप
मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता. शिवाय पोलीसांचे अभय असल्याशिवाय हल्लेखोर मनसेसैनिक फरार राहू शकत नाही, असंही आमदार अमोल मिटकरी म्हणाले. परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.
राज ठाकरेंच्या आदेशावरुनच हल्ला
अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि प्रदेश सरचिटणीस कर्ण बाळा दुबळे यांच्या चिथावणीवरून झाल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडल्याचं समर्थन करत, त्या मनसैनिकांचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटले होते. त्यानंतर, अमोल मिटकरी यांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.
कार्यकर्त्यांवर गुन्हे, तिघांना अटक
अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आतापर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. तर उर्वरित फरार असलेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, मिटकरी यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्याने आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतंय.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




