गार ‘वडापाव’ दिला म्हणून ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण; पुण्यातील घटना

पुणे – बालेवाडी परिसरात ‘वडापाव’वरून स्नॅक्स सेंटर चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वडापाव गार असल्याने तिघांनी विक्रेत्यावर काचेची भरणी फेकून मारत चहाचा थरमास फेकून देत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. यानूसार अंकुश कोंडीबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साईचौक येथे शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्याठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास ढेबे व त्याचे दोन मित्र सेंटरवर आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थरमास खाली फेकून तो फोडला. तर ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकूम मारली. यात त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. गार वडापाववरून मारहाण झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




