अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; धक्कादायक घटनेमुळे अकोला हादरलं

अकोला : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.जय मालोकार असे या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेनंतर अमोल मिटकरी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी मोठा राडा घातला. या राड्यात जय मालोकारही सहभागी होते.
जय मालोकार हे 28 वर्षांचा होते. त्यांना दुपारच्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. यानंतर अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जय मालोकारला हृदय विकाराचा झटका येईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. पण जय मालोकारला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात मालोकारचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांची मागणी
जय मालोकार यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामध्ये जय मालोकार यांना कोणी धक्काबुक्की केली मारहाण केली याचा सर्व तपास करून न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 26 वर्षाचा तरुण असा अचानक निघून गेल्याने कुटुंबियांसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तसेच आतापर्यंत मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुटुंबीयाशी संपर्क साधला नसल्याचही जय मालोकार यांच्या मोठ्या भावाने म्हटलं आहे.
अमित ठाकरे भेटीला
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा नाशिकचा दौरा रद्द करण्यात आला आहे. अकोल्यामध्ये मनसैनिक जय मालोकार याच्या मृत्यूमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मालोकार कुटुंबियाची भेट घेण्यासाठी अमित ठाकरे अकोल्याला जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




