‘मराठी’ यायलाच पाहिजे म्हणत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदाराला मारहाण, 7 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : “तू महाराष्ट्रात राहतोस तुला मराठी यायलाच पाहिजे” असे बोलुन विश्रांतवाडी येथील एका मेडिकल दुकानदाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे ) ६ ते ७ कार्यकर्त्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी धानोरी येथे घडली होती.

गणेश पाटील (४०) व त्याचे इतर ५ ते ६ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत यश गोकुळ छल्लानी (२५, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. १८ ) सायंकाळी धानोरीतील एका मेडिकलमध्ये ही घटना घडली होती.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यश हे मेडिकलमध्ये असताना मनसेचे गणेश पाटील आणि त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. महाराष्ट्रात राहतोस तुला मराठी यायलाच पाहिजे, असे बोलून त्यांना दुकानाच्या बाहेर ओढले. त्यांच्या अंगावर शाई टाकून झाल्या प्रकरणाबाबत माफी मागण्यास लावले. याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करून फिर्यादी यांची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page