चालत्या बसमध्ये मद्यपींनी बसचे स्टेअरिंग घेतले हातात, प्रवाशांचा उडाला थरकाप

पिंपरी : चालकाला दमदाटी करत मद्यपींनी चालत्या बसचा ताबा घेतला. या प्रकारामुळे वाहनांना आणि नागरिकांना बसची धडक बसण्याची शक्यता होती. यावेळी बसमधील प्रवाशांचा अक्षरशः थरकाप उडाला. ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास भोसरी येथे घडली.

याप्रकरणी सचिन गुणाजी पारधे (रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष जाधव (वय ४०), जितेश रमेश राठोड (वय ३६, रा. महाळुंगे, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या मद्यपींची नावे आहेत. हे दोघेही पीएमपीचे कंत्राटी चालक आहेत.

Advertisement

जाधव व राठोड यांनी दारूच्या नशेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला हात दाखवला. त्यानंतर त्यांनी बसमध्ये चढून बसचालक सूरज सुखलाल काळे (वय २४) यांना शिवीगाळ केली. बसचालकाच्या केबिनमध्ये जाऊन ‘तू शांत बस, आम्हीसुद्धा बसचालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस,’ असे म्हणत आरडाओरडा करीत बसचे स्टेअरिंग हातात घेतले.

यामुळे बस वाकडी- तिकडी होऊन रस्त्यावरील वाहनांना व नागरिकांना धडकून अपघात होऊ शकतो, असे कृत्य त्यांनी केले. दरम्यान, बस चालकाने स्टेअरिंग ताब्यात घेत बस जाग्यावरच थांबवली. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून, त्यांची गचांडी पकडून त्यांच्या मानेवर नखाने ओरखडले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी बसमधील प्रवाशांनाही शिवीगाळ केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page