पुण्यात डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 3 जणांना ठोकल्या बेड्या

पुणे – पुण्यातील ग्रामीण भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना निर्जनस्थळी बोलावून अपहरण करत लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकारच्या तीन ते चार घटना उघडकीस आल्या असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सुशांत पोपट नागरे (वय २५, रा. प्रेमभारती नगर, बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर), मयुर राजू गायकवाड, (वय २४ रा. गांधीनगर चौथे कॉलनी, बोल्हेगाव अहमदनगर, श्रेयस भाउसाहेब आंग्रे (वय २४, रा. संभाजीनगर, नागापूर अहमदनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कडून गुन्हयात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे,

Advertisement

पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेला या आरोपींचा लुटमारीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षकअविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे दीपरत्न गायकवाड, अमित सिदपाटील, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली.

आरोपी नागरे आणि गायकवाड सराइत आहेत. त्यांच्याविरुद्ध नगरमधील तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी भीती दाखवून लुटमारीचे गुन्हे केले. एका तक्रारदार तरुणाकडून त्यांनी ८० हजार रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे तपास करत आहेत. डेटिंग ॲपच्य माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. तरुणींशी मैत्रीच्या आमिषाने चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page