मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता…; अमित शहांचे एकनाथ शिंदेंना उद्देशून मोठे विधान

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या देखील जागावाटपाबाबत बैठका सुरु आहे. जागावाटपाचा तोडगा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जागावाटपाबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी मित्रपक्षांना झुकतं माप द्यावं असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून केंद्रीय मंत्री अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीच्या माध्यमातूनच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अजित पवारांना सत्तेत सामील होताना भाजपने जो शब्द दिला आहे तो शब्द पाळणार असल्याची माहिती आहे. त्याचमुळे आता भाजप नेते अमित शाहांनी स्वतः जागावाटपामध्ये सक्रिय भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रिपद हे शिंदेंकडे आहे, त्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात असा आग्रह आता भाजपकडून केला जात आहे.
अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




