गरबा खेळताना झालेल्या वादातून केला गोळीबार, चाकणमधील घटना

पुणे : दांडियाचा कार्यक्रम सुरू असताना जोरदार भांडणे झाली. दांडियाचा कार्यक्रम बंद झाल्यानंतर या वादातून एकावर गोळीबार करण्यात आला, तर एकाच्या डोक्यात वीट घालून त्याला जखमी केले. आणखी एकाने हवेत गोळीबार करून दहशत माजविल्याची घटना येथील औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे (ता. खेड) गावात शनिवारी (ता. १२) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सौरभ मुळे (वय २७, रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) याच्यासह तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

Advertisement

गोळीबारात नीलेश असाटी हा तर डोक्यात वीट घातल्याने सूरज कदम जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मुळे व शंकर नवगणे यांच्यात महाळुंगे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील छावा प्रतिष्ठान मित्रमंडळ येथे गरबा दांडिया खेळताना भांडणे झाली. त्यानंतर महिलांत भांडणे झाली. आमच्या भागात राहत असून, तू आमच्यावर दादागिरी करतो का? असे म्हणत महिलांनी मुळे याला मारहाण केली. त्यानंतर दांडियाचा कार्यक्रम बंद पडला.

सौरभला झालेल्या मारहाणीमुळे त्याच्याबरोबर असलेल्या दोघांपैकी एकाने नीलेश असाटी याच्यावर गोळीबार केला. त्यात नीलेशच्या छातीवर गोळी लागली. तसेच एका आरोपीने सूरज कदम याच्या डोक्यात वीट मारली. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळीबार केला. याप्रकरणी सूरज कदम याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. यापूर्वीही या गावात खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह कामगारांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page