रेल्वेतून विनातिकीट प्रवास महागात! तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

पुणे : रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. रेल्वेस्थानक व पुणे विभागातून विनातिकीट, अनियमित तिकीट काढून फिरणाऱ्या सुमारे २४ हजार प्रवाशांवर सप्टेंबरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ९२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १ लाख ७१ हजार ४२० प्रवाशांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून सुमारे १० कोटी ७३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
सप्टेंबरमध्ये पुणे विभागात तिकीट तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवास करताना २० हजार ५६९ प्रवासी आढळून आले. तर अनियमित तिकिटावर प्रवास करताना २९८६, तसेच सामान बुक न करता प्रवास करणारे ३८७ प्रवासी आढळले. अशा सर्व प्रवाशांवर कारवाई करून सुमारे ९२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




