गॅरेजवर कामगारांना टोळक्याने मारहाण करुन लुटले, आरोपींना पोलिसांनी केली अटक

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकीवरुन आलेल्या ९ ते १० जणांच्या टोळक्याने बालेवाडी येथील एका गॅरेजवर दरोडा टाकला आहे. गॅरेजमधील लोकांना हत्याराने धमकावून त्यांना मारहाण करुन लुबाडले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली असून ५ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. ही घटना बालेवाडी येथील विलास तात्या बालवडकर चौकातील रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

अलीम सय्यद (वय १९), देवा शिरोळे (वय २०) आणि मोहन अडागळे (वय १९) यांना अटक केली असून अन्य ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सिद्धेश्वर दिगंबर ढेरे (वय ३४, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर हे गॅरेज आहे. ते गॅरेजमध्ये असताना तीन वेगवेगळ्या दुचाकीवर चेहरा झाकलेले ९ ते १० जण गॅरेजमध्ये शिरले. त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हत्याराने व लाकडी काठ्यांनी फिर्यादी व गॅरेजमधील इतर लोकांना धमकावले. तसेच मॅकेनिक व गिर्‍हाईक यांना त्यांच्याकडील हत्याराने मारुन जखमी केले. गॅरेज कामाची मिळालेली रक्कम व इतर लोकांची मिळून रोख ४९ हजार रुपये तसेच फिर्यादी यांचा मोबाईल असा ६९ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने हत्याराचा धाक दाखवून काढून घेऊन निघून गेले.

दरोड्याच्या या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळाला भेट दिली. फिर्यादीकडून मिळालेले वर्णन आणि तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आरोपी पिंपळे गुरव, सांगवी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page