महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी; डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्यावत करावे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टिने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.

Advertisement

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहापाई गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी.यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निमुर्लन कक्ष, अंध श्रृद्धा निमुर्लन कक्ष तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.

काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कुल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच गुड टच’ याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सूरू आहेत.

पोलीसांनी गुन्हेगारांवर केलेल्या कारवाई संदर्भातील यशकथा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. यामुळे समाजातील नागरिकांचा कायद्यावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. पुणे शहर व परिसरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस विभागाने सदैव तत्पर रहावे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page