मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात, चालक जखमी

यवतमाळ – यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या एका कारमधून मागून येत होते. त्यांची कार पुढे निघाली होती. हा अपघात यवतमाळमधील कोपरा या गावात गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये संजय राठोड यांच्या कारचा चालक एअरबॅग्जमुळे बचावला आहे.
कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पोहरा देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री असलेले संजय राठोड यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर गेले होते. येताना त्यांच्या या गाडीचा अपघात झाला आहे. राठोड हे अपघात झालेल्या गाडीमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी ते एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यामुळे कार पुढे निघाली. मागून संजय राठोड यांची कार येत होती. काही मिनिटांतच संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




