राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; विरोधक आक्रमक

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार,पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन
४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून खाली कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता. ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे, अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




