म्हाडा कार्यालयाचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात; 4 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं

सातारा : राज्यात लाच स्वीकारल्याच्या अनेक बातम्या आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. अशातच आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जमीन विक्री करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारताना म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ लिपिकला रंगेहाथ पकडले आहे. मनोज कुमार दशरथ माने असे लिपीकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा विभागाच्या पथकाने ही करावाई केली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे सातारा रोड तालुका कोरेगाव येथे म्हाडा वसाहतीत प्लॉट आहे. हा प्लॉट विक्री करण्यासाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती. यासाठी त्यांनी म्हाडा कार्यालयात अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्रासाठी येथील वरिष्ठ लिपिक मनोज माने याने तक्रारदाराकडे सात हजार रुपयांची मागणी केली होती. दाखला देण्यासाठी तो दोन महिने टाळाटाळ करत होता. तडजोडीअंती ४ हजार रुपये रक्कम देण्याचे तक्रारदारने मान्य केले होते.
याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार अर्ज दिला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे ही तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार गणेश साठे, पोलीस हवालदार निलेश चव्हाण यांच्या पथकाने कार्यालय परिसरात सापळा लावला होता, दरम्यान लाच घेताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




