मुसळधार पावसाने पुण्याला झोडपले; रस्त्यांवर पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ

राज्यात अनेक ठिकाणी येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यादरम्यान पुणे शहर आणि परिसरात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील मध्यवर्ती भागांसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी चिंचवडसह परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. दहा पंधरा मिनिटांतच ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. जोरदार वारे, मुसळधार पावसाचा मारा सुरू असल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.
वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पावसाने झोडपून काढल्यामुळे रविवारी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली. शहरात सखल भागात पाणी साचले होते. पुणे शहरासह येरवडा, विमान नगर, सहकार नगर, कोथरूड सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी चिंचवड शहरासह बाणेर, दिघी परिसरात जोरदार पाऊस झाला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




