कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार; तरुण जखमी, हल्लेखोर पसार

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी तन्वीरला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरातील श्री नवश्या गणपती मंदिरजवळ कारमधून चाललेल्या एका तरुणावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तणवीर हनीफ रंगरेज (वय ३६) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला उपचारासाठी तत्काळ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
घटनास्थळावरून कार (एम एच 42, 14 61) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गोळीबारात कारच्या दोन बाजूच्या काचा फुटल्या आहेत. हल्लेखोरांनी सहा राऊंड केल्याची माहिती आहे, घटनास्थळावरून पाच काडतुसे पोलिसांना मिळून आली आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




