पुण्यात तरुणीच्या खुनाचा भयंकर प्रकार; डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले

पुणे – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येत आहेत. तरुणीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत जे अत्याचार होत आहेत ते अत्यंत भयानक आहेत. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर बदलापूर येथील दोन चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकराने संपूर्ण देश हादरला आहे. असे असतानाही पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात अज्ञात तरुणीचा खून करून मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
खराडी येथील मुठा नदीपात्रात तरुणीचे धड पोलिसांना आढळले असून, तिचे दोन्ही, हात दोन्ही पाय तसेच मुंडके नसल्याचे दिसत आहे. याघटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खून झालेल्या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके असून, तिची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस हवालदार गजानन पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खराडीत जेनी लाईट कन्स्ट्रक्शनमार्फत बांधकाम सुरू आहे. येथून जवळच मुठा नदीचे पात्र आहे. तेव्हा येथील नागरिकांना व कामगारांना एका महिलेचे हात पाय व मुंडके नसलेल्या अवस्थेत शरीर पाण्यावर तरगंत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
दरम्यान, मयत तरुणीची ओळख पटलेली नाही. तरुणीचे अंदाजे वय १८ ते ३० मधील असावे. अज्ञाताने तिला मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून व दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुठा नदीपात्रात टाकून दिले, असेल असे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक माने हे करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




