पुण्यात डिलिव्हरी बॉयने केला मित्राचा खून, कारण वाचून बसेल धक्का

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेनकोटवरुन झालेल्या वादातून डिलिव्हरी बॉयने मित्राचीच हत्या केल्याची घटना घडली आहे. दोन डिलिव्हरी बॉयमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हत्येमध्ये झालंय. पुण्यातील नर्हे भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यातील सिंहगड रोड भागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय २४, रा. धायरी, मुळ. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरेश भिलारे (रा. नर्हे, मुळ. बीड) याला अटक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्यचा मित्र सिद्धेश्वर मोरे (वय २४) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आदित्य व सुरेश भिलारे हे मुळचे बीड जिल्ह्यातील आहेत. पुण्यात ते नोकरीनिमित्त गेल्या काही वर्षांपासून राहण्यास आहेत. नुकतीच त्यांची ओळख देखील झाली होती. त्यानंतर ते मित्र झाले होते. सकाळी एका रेस्टॉरंटसाठी आणि दुपारपासून रात्रीपर्यंत एका कंपनीसाठी डिलीव्हरी बॉय म्हणून दोघेही काम करत असत. दरम्यान, दुपारी डिलीव्हरीसाठी कंपनीत गेल्यानंतर मॅनेजरने आदित्यकडील कंपनीचा रेनकोट सुरेशला दिला. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. या भांडणानंतर ते वाद मिटवले देखील होते. परंतु, रात्री आदित्यने काही मित्रांना बोलवून घेतले व सुरेशला फोन करून नऱ्हे येथील एका हॉटेलसमोरील चौकात भेटण्यास बोलावले.
रात्री साडे आकराच्या सुमारास हे सर्व वाद मिटवू यासाठी भेटणार होते. तेव्हा सुरेश एकटाच होता. तर, आदित्य व त्याचे काही मित्र सुरेशला भेटण्यास म्हणून गेले होते. तेव्हा त्यांच्यात पुन्हा वादावादी सुरू झाल्यानंतर सुरेशने जवळ ठेवलेला चाकू बाहेर काढत आदित्य याच्या छातीत भोसकला. यात घाववर्मी लागल्याने आदित्यचा मृत्यू झाला. आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहताच त्याचे मित्र आणि आरोपी तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिंहगड रोड पोलिसांनी येथे धाव घेतली. आरोपी पसार होताच सिंहगड रोड पोलिसांच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या पथकाने आरोपीचा माग काढला. तेव्हा त्याला पहाटे मुळ गावी पळून जाण्याच्या पुर्ण तयारीत असताना पकडले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली देत घटनेची माहिती दिली. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




