संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरुन नाना पटोले संतापले; दिला गंभीर इशारा

मुंबई : राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यानंतर राज्यातील काँग्रेस नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून संजय गायकवाड यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Advertisement

नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page