विधानसभेत मराठा समाजाची ताकद दिसणार, जरांगे पाटलांकडे तब्बल 800 इच्छुकांचे अर्ज

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा जाहीर केला आहे. या आकड्यावरून मनोज जरांगे यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येत आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वतः आकडेवारी जाहीर करत 800 इच्छुकांचे अर्ज आल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले, आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल. पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. तर मराठवाडा, विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आले आहेत. अर्ज येतच आहेत. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे ठरवायचे आहे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
29 तारखेला चर्चासत्रं
येत्या 29 तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे. या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेला अंतरवलीत एक छोटेखानी चर्चा सत्र ठेवू. कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




