कोथरूडमध्ये अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी रविवारी (दि.6) जनआशिर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 40 हजार हून अधिक नागरिकांना दिवाळीनिमित्त सरंजाम वाटप करण्यात आले. यावेळी अमोल बालवडकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
या जाहीर मेळाव्यात बालवडकर म्हणाले, “कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी जेव्हा इच्छुक झालो तेव्हापासून आमच्या पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कार्यक्रमाला येत नाहीत. लोकसभेत पक्षाचं काम करत असताना जनतेत गेलो तेव्हा लोक म्हणाले की, भाऊ तुम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. मग मी पक्षाकडं उमेदवारी मागितली. पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की, मला माहित आहे कोणाला उमेदवारी मिळणार आहे. पण मला इच्छुक म्हणून राहु द्या. उद्या निवडणुकीत मी तुमचंच काम करणार आहे. पण जेव्हा मी इच्छुक झालो तेव्हा आमच्याच पक्षाचे नेते म्हणाले तू इच्छुक कसा राहिला, आत्ता तुला पक्षातून काढून टाकणार आहे. मी काय गुन्हा केला का, मी तर फक्त इच्छुक आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही. कोणालाही पाठवायच नाही असं सुरू आहे. तरी मी आज माझ्या कोथरूड मतदारसंघातील मायबाप जनतेलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे.
बालवडकर पुढे म्हणाले की, आजच्या कार्यक्रमातून मी पक्षाला फक्त एवढेच सांगत आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाने माझा विचार करावा मी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड मतदार संघातून इच्छुक असून पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर मग मला वेगळा विचार या जनतेसाठी घ्यावा लागणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.




