भोंदू बाबाने उच्चशिक्षित तरुणीला घातला 18 लाखाचा गंडा, नेमकं काय घडल?

पुणे – एक उच्चशिक्षित 21 वर्षीय तरुणी जी अमेरिकेतील शिकागो याठिकाणी शिक्षण घेते, ती एका भोंदू बाबाच्या नादाला लागली अन् 18 लाख रूपये गमावून बसल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या फसवणुकी प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा.पिंपरी चिंचवड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी मुळची पुण्यातील कोथरूड भागातील आहे. ती अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी उच्च शिक्षण घेत आहे. दरम्यान, तिची ओळख आरोपी सिद्धार्थ याच्यासोबत झाली. ते फोनद्वारे संपर्कात होते. तेव्हा सिद्धार्थ याने तरुणीला अध्यात्माद्वारे पूजापाठ आणि जप करून फिर्यादी सह त्यांच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगितले. यासाठी त्याने तिला पैसे खर्च करावे लागतील असे सांगितले. पूजा झाल्यानंतर हे पैसे परत देतो असे आश्वासन देखील दिले होते. त्यानुसार तिच्याकडून तरुणीकडून ११ लाख ८३ हजार रुपये घेतले.
दरम्यान, तरुणी पुण्यात परत आली असता त्यांचे महागडे कपडे, बॅग व इतर वस्तूही घेतल्या. तिला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून सोन्याचा हार व सोन्याच्या बांगड्या असा ५ लाख ५९ हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला. तर, २ लाख ८२ हजार रुपये रोख घेतले. दरम्यान या सर्व घटनेनंतर तरुणीला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. तिने पैसे व वस्तू परत मागितल्या असता त्याने ते देण्यास टाळाटाळ केली. तसेच, तरुणीला फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




