खासदार वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन, नांदेड जिल्ह्यावर शोककळा

नांदेड : नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे जाण्यास सांगितले. त्यामुळे एअर अॅब्युलन्सने त्यांना हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला.

Advertisement

वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत. अत्यंत कठिण काळात ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले व लोकांच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. गावचे सरपंच, विधानपरिषद, विधानसभा या दोन्ही सभागृहाचे सदस्य, लोकसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून नांदेड जिल्ह्याचा विकास करणे हे हेच ध्येय ठेवून ते सतत कार्यरत होते. राजकारणासोबतच शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page