बिस्किट खाल्ल्याने संभाजीनगरमध्ये 181पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेमधील सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले होते. हे बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचे पोट दुखू लागले. काही जणांना मळमळ, उलट्या होऊन सुमारे 293 विद्यार्थ्यांपैकी 181 विद्यार्थी तापाने फणफणल्याचं प्रकार लक्षात आल्यावर या सर्व विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. काहींना सलाइन लावण्यात आले. सर्व मुलांवर उपचार सुरु आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




