पुण्यातील फिनिक्स माॅलला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, पुण्यात खळबळ

पुणे : विमाननगर भागातील फिनिक्स मार्केट सिटी माॅलमध्ये बाॅम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणाऱ्या ईमेल पाठविण्यात आल्याने घबराट उडाली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी धमकीचा ईमेल पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आदित्य राजेश शितोळे (वय ३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शितोळ फिनिक्स माॅलमध्ये व्यवस्थापक आहेत. शनिवारी दुपारी शितोळे यांनी माॅलमधील वरिष्ठ व्यवस्थापक संदीप सिंग यांना आलेल्या ईमेलची पाहणी केली. तेव्हा फिनिक्स माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल माॅल प्रशासनाला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. हिडनस बोन नावाच्या एकाने मेल पाठविण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर माॅल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
विमानतळ पोलीस व बीडीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. इमेल करणार्याने नागरिकांमध्ये अफवा पसरविण्याच्या दृष्टीने इमेल केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जी. बी. होळकर करीत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




