पुण्याचा आढावा घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप; म्हणाल्या…

पुणे : मागील दोन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला पाणीपुरवठा देणारे खडकवासला धरण पूर्ण भरल्यामुळे आणि पाऊसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजता विसर्ग करण्यात आल्यामुळे अनेक नदीलगत असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. लोकांची गैरसोय झाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

Advertisement

“आता राजकारण करायचं नाही, आपली लोकं अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलो आहोत. राजकारणासाठी खूप वेळ आहे. कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांनीदेखील जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं. महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पुन्हा एकदा स्थानिकांवर संकट आलं आहे. या संकटामुळे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. महिला रडत आहेत. मुलांच्या परीक्षा असतील, मुलांचे कागदपत्रे असतील, आताच एक महिला मला सांगत होती की, तिने कर्ज काढून फर्निचर केलं होतं. पण सारं उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार कोण? अर्थातच हे महाराष्ट्राचं सरकार”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

“माझी या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की, थोडावेळ राजकारण, घरफोडी, पक्षफोडी बाजूला ठेवा. माणुसकी दाखवा. हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. माझी मागणी आहे की, या संपूर्ण भागातील नागरिकांसाठी एक वेगळं पॅकेजची घोषणा व्हावी. पाण्याच्या टाक्या तातडीने साफ झाल्या पाहिजेत. दिवसातून दोन ते तीन वेळा फवारणी झाली पाहिजे. स्वच्छ पाणी आणि वीजेची सोय ही सर्वात आधी झाली पाहिजे. यानंतर प्रत्येकाला आर्थिक मदत झाली पाहिजे. प्रत्येकाला एक महिन्याच्या धान्याचा पुरवठा झाला पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page