एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, काय आहे कारण?

मुंबई : राज्याला सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी तसेच सत्तेत येण्यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड चालू आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या घटकपक्षांचे शीर्षस्थ नेते अनेकवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. असे असतानाच आता पुन्हा एकदा हे नेते मंडळी आज (27 जुलै) दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित होऊ शकते, असे सांगितले जात आहे. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीने आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्यला निश्चित करून महायुतीने निवडणुकीच्या कामाला लागण्याची तयारी सुरू केली आहे.
विधासनभेसाठी शिंदे गटाने 100 तर अजित पवार गटाने 80 जागांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, स्थानिक भाजप नेते 150 पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट असू शकते. दिल्लीतच हा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




