जादा प्रवासी भाडे आकारुन प्रवाशांची लूट करु नका, पुणे अर्बन सेलची मागणी

पुणे – दीपावली काळात शासकीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी आणि रेल्वे यांचे बुकिंग फुल असल्याने अनेक खासगी बसचालक याचा गैरफायदा घेताना दिसून येतात. परिवहन विभागाच्या नियमानुसार ५०% वाढीव दर घेण्याची मुभा खासगी वाहन चालकांना दिली असूनही या दर तीन पट वाढत असल्याने नागरिकांची प्रचंड प्रमाणात लूट दिसून येते. यावरुन आता पुणे अर्बन सेलने निवेदन देत आवाज उठवला आहे.

वडगाव शेरी विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्षा नीताताई गलांडे यांनी परिवहन विभागात उपनिरीक्षक स्वप्नील भोसले यांना निवेदन देत आवाज उठवला. यावेळी खाजगी वातानुकुलीत बसचे दरपत्रक ठरवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून यावर अधिकारी वर्गाने सकारात्मक कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे. एसटी महामंडळामध्ये आयेशा शेख यांच्या सहाय्यक वाहतूक अधिक्षक यांच्याकडे निवेदन देताना दीपावली काळात एसटी बसेसची संख्या वाढवण्यात यावी आणि दर्जा सुधारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

साईनाथ नगर ते वडगाव शेरी गावठाण या ठिकाणी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या मार्गावरील खासगी वाहनांकडून जाताना ६० रुपये आणि येताना ६० रुपये असा १२० रुपये दर शालेय विद्यार्थ्यांकडून आकारला जातो. हा दर मासिक ३६०० रुपये असून साईनाथ नगरपासून बॉलिवूडमार्गे पुणे स्टेशनला जाणारी बस शालेय वेळेत साईनाथ नगर – वडगाव शेरी – पुणे स्टेशन या मार्गाने जावी, अशी वाहतूक नियोजन व संचालन अधिकारी नारायण करडे यांच्याकडे मागणी केली. अधिकारी वर्गाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे. याप्रसंगी वडगाव शेरी विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्षा नीताताई गलांडे, कोथरूड विधानसभा अर्बन सेलच्या अध्यक्ष मीनल ताई धनवटे तसेच अर्बन सेलचे सदस्य अब्दुल भाई तांबोळी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page