भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आज पुण्यात अधिवेशन; अमित शहा, नितीन गडकरींची उपस्थिती

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सोमवारी भाजपचं महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये भाजपचं महासंमेलन पार पडणार असून त्याआधी रविवारी (आज) भाजप प्रदेश कार्यकारणीचं अधिवेशन पार पडत आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपकडून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले जाणार आहे. लोकसभा पराभवावर राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईत मंथन केले. त्यावेळी मित्रपक्षांविरोधात पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा सूर आळवला हाेता. विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर करावे आणि उमेदवार निश्चित करावा अशी मागणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपकडून ‘संवाद यात्रा’ आयाेजित केली जाणार आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहेत.
या यात्रेच्या स्वरुपाला या अधिवेशनात अंतिम स्वरु दिले जाणार आहे. राज्यातील पाच हजार भाजपा पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची तयारी पुर्ण झाली असुन, बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे हे अधिवेशन पार पडेल. केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच राज्यातील सर्व प्रमुख नेते, मंत्री या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




