नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- माझ्याविरोधातील तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही हेतूपुरस्परपणे त्रास देण्याच्या आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मंत्र्याच्या दबावामुळे निलंबन झालं आहे. या निलंबनामुळे माझे कुटुंब मानसिक तणावाखाली आहे.
माझं म्हणणं न ऐकून घेता निलंबन करून माझ्यावर अन्याय झाला असून हे निलंबन मागे घ्यावे यासाठी निलंबित सरकारी अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.डॉ. भगवान पवार यांनी पत्रात म्हटलंय की, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी म्हणून एकूण सेवा ३० वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे १३ वर्षे उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. माझे गत ५ वर्षातील गोपनिय अभिलेख अत्युत्कृष्ठ असून वरिष्ठ अधिकारी यांची कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोविड १९ च्या काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे. विविध कामकाजाबाबत माझा आयुक्त, आरोग्य सेवा, पुणे जिल्हाधिकारी, पालकंत्री पुणे, सातारा यांच्यामार्फत वेळोवेळी सत्कार केलेला आहे. सद्यस्थितीत मी पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून १३ मार्च २०२३ पासून कार्यरत होतो. याठिकाणी माझ्या कामाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही. पुणे महापालिका आयुक्तांनीही माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरीही शासनाकडून माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत ते मला २४ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता मिळाले असं त्यांनी सांगितले.




