माळेगाव पोलिसांचा ‘टेक्निकल ट्रॅक’; १.५६ लाखांचे ७ मोबाईल शोधून केले परत..!

बारामती तालुक्यातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून परत देण्यात माळेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखवली आहे. विविध ठिकाणी हरवलेले तब्बल १ लाख ५६ हजार ५८५ रुपये किमतीचे सात मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोबाईल हरविल्याच्या तक्रारींचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा करत महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणांहून मोबाईलचा शोध लावला.
शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सॅमसंग, वन प्लस, विवो आणि ओप्पो या कंपन्यांच्या विविध मॉडेल्सचा समावेश असून त्यांची एकूण किंमत १ लाख ५६ हजार ५८५ रुपये इतकी आहे. तक्रार निवारण दिनानिमित्त शनिवार (१३ जून) रोजी हे सर्व मोबाईल संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून माळेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचा शोध घेऊन ती सुरक्षितपणे परत करण्याच्या पोलीस दलाच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाले आहे.




