गुटखा विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमास वाहनासह केले जेरबंद..!

दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे आंबेगाव परिसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत आरोपीचा मोठ्या प्रमाणात भरलेला प्रतिबंधीत गुटख्याचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७ कात्रज घाटमार्गे पुणे येथे येणार आहे.
सदर बातमीचे अनुषंगाने मा. वरिष्ठांचे परवानगीने दिनांक २८/०४/२०२६ रोजी रात्रौ ००.३० वा. पासून
कात्रज घाट येथे सापळा रचला परंतु बराच वेळ होवून गेला तरी सदरचा ट्रक कात्रज घाटातून न आल्याने त्याबाबत अधिक माहीती घेतली असता सदरचा गुटख्याने भरलेला ट्रक हा खेड शिवापुर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली. सदरबाबत मा. वरिष्ठांना माहीती देवून त्यांच्या परवागीने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथील पोलीस मदत घेवून खेड शिवापुर टोल नाका येथे उभा असलेल्या ट्रक क्र. एम.एच.११ डी.डी.-६५२७ वरील चालक नामे श्रीशैल तम्माराय हाळके, वय ३२ वर्ष रा. मु.पो उमदी, ता. जत, जि. सांगली यास ताब्यात घेतले.
सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल गुटखा मिळून आला असून सदरचा गुटखा हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील दोन आरोपीतांनी पुणे शहरात विक्रीसाठी मागवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
जप्त मुद्देमाल
१) ६०,२२,८००/- रू. किं. चा प्रतिबंधित विमल गुटखा.
२) २०,००,०००/- रू.किं.चा टाटा कंपनीचा ट्रक नं. एम.एच.११ डी.डी.-६५२७
३) १०,०००/- रू.किं.चा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट.
एकुण ८०,३२,८००/- रू.
सदरबाबत राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे गु.र.नं. १६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अति कार्यभार गुन्हे) श्री विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा. पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड व अक्षय शिर्के तसेच महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे तसेच राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणकडील पथकाने केली आहे.




