मार्केट यार्ड वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बेशुद्ध नागरिकाचे प्राण वाचले..!

प्रेस नोट (प्रसिद्धीसाठी)
दिनांक 27 एप्रिल 2026
मार्केट यार्ड वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचल्याची घटना आज समोर आली असून, त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज दुपारी सुमारे 12.20 वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड चौक येथे कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल श्री. तानाजी राऊत व पोलिस कॉन्स्टेबल श्री. दीपक गाडगे यांनी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीस पाहिले. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी कोणतीही वेळ न दवडता संबंधित व्यक्तीस तात्काळ राव नर्सिंग होम, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले.
वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. रुग्णाचे नाव दत्तात्रय रणधावे (वय 47 वर्षे, रा. चरोली) असे असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेबाबत राव नर्सिंग होमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले की, “पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता व मानवतावादी दृष्टिकोन अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेळेवरच्या मदतीमुळे रुग्णाचा जीव वाचला.”
सदर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेचे व सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
-पुणे शहर वाहतूक शाखा.




