माळेगाव शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाण्याच्या टाकीत आढळल्या पाली..!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आंदोलनाचा इशारा केलेला आहे..!

माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाली आढळल्या. संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला. या घटनेचा निषेध करत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माळेगाव कारखाना संचालित शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल माळेगाव येथे असून, हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. या इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका इमारतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाली आढळल्या, काही विद्यार्थ्यांनी या पालींच्या वास्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या संबंधितांकडे या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असे निवेदन दिले आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. संस्थेने याकडे गांभीयनि पाहण्याची गरज आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर कॉलेजच्या संचालक मंडळाला जाग येणार का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.




