मुठा नदी पात्रात महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे – पुण्यातील शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरातील मुठा नदी पात्रात जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रेल्वेच्या धडकेत हा मृतदेह पटरीवरून खाली पडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेची ओळख पटली असून, सुहासिनी सुधीर देसाई (वय ७५, रा.विवेकानंद सोसायटी सिंहगड रोड) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीगनर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, सुहासिनी या रेल्वे पटरीवर कशा गेल्या, त्यांचा अपघात आहे की आत्महत्या यासह इतर बाबी गृहीत धरुन पोलीस तपास करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरातील मुठा नदी पात्रात महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानूसार, घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे पटरीवरून महिलेचा मृतदेह खाली पडल्याचे समोर आले. घटनास्थळी महिलेची पर्स मिळून आली आहे. त्यामध्ये मिळून आलेल्या आधारकार्डद्वारे महिलेची ओळख पोलिसांनी पटवलेली आहे. याबाबत महिलेच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवले आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




