डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काशीनाथ अंबादास गवंडी (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शिवानंद राजशेखर गणमुखी (वय २४, सध्या रा. व्हीआयटी महाविद्यालय चौक, बिबबेवाडी, अप्पर इंदिरानगर) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत शिवानंद याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काशीनाथ आणि शिवानंद बिबवेवाडी भागात राहायला आहेत. मंगळवारी दुपारी दुचाकीस्वार शिवानंद आणि त्याचा मित्र काशीनाथ मूळगावी निघाले होते. बोपोडीतील डॉ. आंबेडकर चौकात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात काशीनाथ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेला काशीनाथ आणि शिवानंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच काशीनाथचा मृत्यू झाला होता. अधिक तपास उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




