‘ते’ वक्तव्य भोवलं, वसंतराव देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (25 ऑक्टोबर) सुजय विखे यांची सभा झाली. या सभेदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वसंत देशमुख फरार झाले होते. वसंत देशमुख यांना अटक करण्यात यावी, यासाठी थोरात कुटुंबियांनी रात्रभर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत वादग्रस्त वक्तव्य करून फरार झालेल्या वसंत देशमुख यांच्या तपासासाठी तब्बल 12 पोलीस पथकं रवाना केली होती. आज अखेर पोलिसांनी वसंत देशमुख यांना पुण्यातील एका अज्ञात स्थळावरुन ताब्यात घेतलंय.
वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य नंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे स्वतः अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत संबंध प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पथके तयार केली होती.
मी या वक्तव्याचा निषेध करतो – सुजय विखे पाटील
सुजय विखे पाटील यांच्या सभेत ही घटना घडली, त्यांनीही या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वसंत देशमुखांनी या वक्तव्यानंतर संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गाड्यांचीही तोडफोड आणि जाळपोळ केली होती. यानंतर सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
मी जयश्री यांना ताई म्हणून संबोधतो, महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. भाषणादरम्यान मी त्यांना दोनवेळा थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. महायुतीच्या कोणत्याही व्यक्तीचं त्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. अशाप्रकारे कोणी नेता बोलत असले, तर त्याला पक्षात ठेवलं जाणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




