राहुल गांधींची जीभ छाटायची गरज नाही, पण…; भाजप खासदाराची जीभ घसरली

अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली होती, त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे ?
बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांच बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान केलं होतं. ते ताजं असतानाच आता भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधी यांच्या यासंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडालीय. ‘ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीये. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे ‘ अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. राहुल गांधी, ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असोत असे म्हणत भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी ज्ञानेश महाराव श्याम मानव यांच्यावरही टीका केली. ‘ भारतामधील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे’ असा पुनरुच्चार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




