दोन महाविद्यालयीन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

पुणे : मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव येथे मित्र – मैत्रीणीसह फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तलावात उतरल्यानंतर दोघेही गाळात अडकले. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. ओजस आनंद कठापुरकर (वय २२, रा. प्राधिकरण, निगडी), राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर जळगाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
फर्ग्युसन महावि्द्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.एससी इलेक्ट्राॅनिक्स) विभागातील विद्यार्थी ओजस कठापुरकर, राज पाटील, तसेच मित्र- मैत्रिणी असे नऊजण रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून खांबोली तलावाजवळ फिरण्यासाठी आले होते. तेथे गेल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. त्यावेळी ओजस आणि राज तलावात साचलेल्या गाळात अडकले. त्यांच्याबरोबर असलेले मित्र पाण्यातून बाहेर पडले.
ओजस आणि राज गाळात अडकल्याची माहिती त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ओजसला बाहेर काढले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्थानिक डाॅक्टरांनी सांगितले. गाळ्यात अडकलेल्या राजचा जवानांनी शोध घेतला. त्याला बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




