इम्तियाज जलील यांच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

पुणे : छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळे फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महेश पांडुरंग भाेईबार (वय २८, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जलील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाले आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात संभाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला. त्यांच्या सांगण्यावरुन जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले. रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास, देवळवाडी फाटा, महिको कंपनी, शेलगांव ब्रिज, मात्रेवाडी या व इतर सर्व ठिकाणच्या फलकांना काळे फासून विद्रुप करण्यात आले आहे. ही घटना जलील आणि त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी जाणीवपूर्वक घडून आणली असून त्यामुळे समस्त हिंदुच्या भावना दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो गुन्हा जालना जिल्ह्यातील चंदनजीरा पोलीस ठाण्यात हस्तांतरीत केला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




