वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक; तब्बल 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त

पुणे : नाना पेठेत रात्रीच्या वेळेस वनराज आंदेकर यांचा दहा ते पंधराच्या जणांच्या टोळक्याने दुचाकींवर येऊन कोयते व पिस्तूलातून गोळ्या झाडून खून केला. खूनात कौटुंबिक वाद, संपत्ती तसेच टोळी युद्ध अशा गोष्टींचा संबंध समोर आला आहे. दरम्यान, आता याप्रकरणात धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. केवळ एक फोन झाल्यानंतर दोन दिवसांतच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील पळून गेलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार देखील जप्त केली आहे.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती, दीर, भाचा यांच्यासह इतरांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हत्या करण्यासाठी कोयते, पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारे याला देखील अटक झाली आहे. त्यानंतर आता या घटनेनंतर पसार झालेला आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने आणि खंडणी विरोधी पथकाने काल (बुधवारी) रात्री उशीरा अटक केली आहे.
आंदेकरांचा कसा खून केला?
सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार केले. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आंदेकर एकटेच असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केला. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तेरा ते चौदा जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर कोयत्यानं वारही केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. त्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




