जोडे मारो आंदोलनातून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका; म्हणाले, आता ह्यांना…

मुंबई : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा समुद्रकिनारी असलेल्या वाऱ्यामुळे पडला असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावरुन शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केले. हुतात्मा पुतळ्यापासून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावरुन आता उद्धव ठाकरेंनीही सरकारवर टीका केली आहे.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

Advertisement

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

शरद पवार काय म्हणाले?

पुढे शरद पवार म्हणाले, “गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या ५० वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक पुतळे आहेत. पण मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्ट्राचाराचा नमुना होत आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्ट्राचार झाला हा जनमाणसांमध्ये समज निर्माण झाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. तसेच संपूर्ण शिवप्रेमींचाही अपमान आहे. त्यामुळे हा अपमान करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page