पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे शहराच्या मध्यभागात शनिवारी (दि. ३१) मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली.

गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असून मंडई, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग परिसरात शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने नागरिकांनी सहकुटुंब खरेदीसाठी गर्दी केली होती. मंडई, तुळशीबाग, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी कोंडीतून वाट काढत खरेदी केली. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुट्टी असल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. अनेकजण मोटारीतून मध्यभागात खरेदीसाठी आले होते.

Advertisement

मध्यभागातील मंडई, नारायण पेठ परिसरात वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने या भागात मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. मध्यभागाासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. खरेदीसाठी आठवडाभर राहिल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला. उपनगरातील नागरिक गणेशोत्सवात आवर्जुन मध्यभागातील मंडई परिसरात खरेदीसाठी येतात. मध्यभागातील गल्ली बोळात बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला

मंडई ते शनिपार परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमामावर गर्दी करतात. गर्दीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी लावाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page