महाराष्ट्राचे पोलिस कर्मचारी धुतायेत आमदाराची गाडी, VIDEO व्हायरल

बुलढाणा : सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. गृहखात्यावर गृहमंत्र्यांचा वचक नसल्याची टीका देखील केली जात आहे. सत्ताधारी आमदार व खासदार पोलिसांवर अरेरावी करत आहेत. त्यामध्ये आता सत्ताधारी आमदारांची गाडी चक्क महाराष्ट्र पोलीस धुत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे.
काय आहे हे प्रकरण? काय आहे व्हिडिओत?
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. त्यात एक पोलीस स्थानिक आमदार संजय गायकवाड यांची कार धुत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रकार आमदार महोदयांच्या घरासमोर घडल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून पोलिसांवर पण टीका करण्यात आली आहे. तर स्थानिक आमदारांवर पण सपकाळ यांनी निशाणा साधला आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा – अंधारे
आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत. राज्यात काय सुरु आहे. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आयते कोलीत मिळत असल्याने विरोधकांच्या टीकेला धार आली आहे. अनेक मुद्यांवर महायुती सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना संधी मिळत असल्याचे चित्र आहे.
संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण
यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझ्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाने बाहेर हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला व प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली. त्यामुळे गाडी संपूर्ण भरली होती व घाण झाली होती, तर गाडी धुण्यावरून ड्रायव्हर व त्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला व ड्रायव्हरने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटलं की, तू उलटी करून गाडी खराब केली तूच गाडी धुवून दे. म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली, यात काहीही गैर नाही. आम्ही त्याला गाडी साफ करण्याचं सांगितलं नाही,” असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




