सरकारचं टेंशन वाढलं ! मनोज जरांगे पाटील यांचे ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण

जालना : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असून 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं. मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकाही केली. अंतरवाली सराटी येथे त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केला असून जरांगे यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं दिसून आलं.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबोसीमधून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. यावरुन आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. अंतरवली सराटी येथून त्यांनी आपले उपोषण जाहीर केले. यावेळी अंतरवलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज जमा झाला होता.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा करताच मराठा समाजाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “29 सप्टेंबरपर्यंत सरकार काय निर्णय घेतयं ते बघू, यांना आता आपण बघू, यांना निवडणूकीमध्ये पण पाडू. त्यांचे 113 आमदार आपण निवडून आणू देत नाहीत. पाडू म्हणजे पाडूच. त्याची काळजी तुम्ही करु नका. आरक्षणासाठी एक कुटुंब गेलं तरी चालतं. आपल्या जातीचं कल्याण होईल. लाखो कुटुंब वाचतील. ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण होणार म्हणजे होणारच, मागे हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. सगळ्या तालुक्यांमध्ये मी जाणार आहे. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र एक होईल. देवेंद्र फडणवीस याची जिरवायची म्हणजे जिरावयचीच. काय व्हायचं ते होऊ दे,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039
पुढे जरांगे पाटील म्हणाले, “हे रस्त्यावरच्या लढाईला घाबरत नाहीत. 29 सप्टेंबरपर्यंत देवेंद्र फडणवीसकडे वेळ आहे. बघू यांना मराठा समाजासाठी माया आहे का नाही? नाही तर 29 सप्टेंबरपासून आपण आरपार लढाई करु. तेव्हा आपण ठरवू काय करायचं ते. मागच्या एक वर्षापासून मी हटलेलो नाही. माझ्या समाजाचं एक वर्ष झालं नुकसान होतयं. माझ्या समाजाची बलिदानं गेली. मराठा आरक्षणासाठी बहिणींचं कुंकू पुसलेलं आहे. कोटीने मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.




