वाहतूक कोंडी करणार्‍यानेच पोलिसाला केली मारहाण; हांडेवाडी चौकातील गंभीर प्रकार

पुणे : वाहतूक कोंडी सोडवत असताना अचानक कार पुढे घुसवून आणखी कोंडी करणार्‍या कारचालकाला वाहतूक पोलिसांनी थांबवले. थांबविल्याचा राग आल्याने कारचालक व इतरांनी पोलिसाला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हडपसर पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वाहतूक पोलीस शिपाई अजिंक्य चंद्रकांत नानगुडे (वय ३४) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. यानूसार मारुती राजाराम माने (वय २२, रा. गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. दुचाकीस्वार सोनू पाटकर (वय २४, रा. उंड्री) व एका कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हांडेवाडी चौकात शनिवारी सायंकाळी घडला.

नेमकं काय घडलं?

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हांडेवाडी चौकात वाहतूकीचे नियमन करीत होते. तेव्हा कार चालकाने पुढे गर्दी झालेली असताना अचानक कार घुसवली. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पोलीस शिपाई अजिंक्य यांनी चालकास थांबण्याबाबत इशारा केला. तेव्हा कारचालक माने याने पोलिसांना शिवीगाळ केली. माने याने शिवीगाळ केल्याने त्याची गाडी बंद करून चावी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्या हातावर लोखंडी वस्तूने मारहाण केली. त्यांच्या पोटात लाथ मारली. तसेच त्याच्याबरोबर असलेल्याने शिवीगाळ केली. तर, सोनु पाटकर यांच्या वाहनांवर पावती केल्याच्या रागातून त्यांनीही शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page