मोठी बातमी! शरद पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा, नेमकं कारण काय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या राज्याची झेड प्लस सुरक्षा शरद पवार यांना आहे. मात्र केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पवारांची सुरक्षा का वाढवली?
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला शरद पवारांना अधिक भक्कम सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. 83 वर्षीय शरद पवार यांच्या भोवती सुरक्षेचं कडं अधिक मजबूत केलं जाणार आहे. केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवच देण्याची शिफारस करण्यात आली होती. याचसंदर्भात सीआरपीएफच्या टीमने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांची सुरक्षा वाढवण्यावर एकमत झाल्यानंतर सुरक्षा वाढवली आहे. सीआरपीएफची एक टीम महाराष्ट्रात या कामासाठी आधीच दाखल झाली आहे.
निलेश राणेंची टीका
“शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, 55 सीआरपीएफ जवान त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय?” असा खोचक सवाल निलेश राणेंनी विचारला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




