लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करुन चूक केली; अजित पवारांची कबुली

मुंबई : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाकडे लागले होते. याचे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदार संघांतून उभे केले होते. तर दुसरीकडे शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे या देखील विरोधात बारामती संघांतून उभ्या होत्या. लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यावर अजित पवारांना मोठा धक्का बसला आणि फक्त सुप्रिया सुळे विजयी झाल्या, यावरुन आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. तसेच राजकारण घरात आणायचं नसतं असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “माझ्या सगळ्या बहिणी माझ्या लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्या सगळ्या बहिणी लाडक्या आहेत. राजकारण हे घरात शिरू द्यायचं नसतं. पण माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळी केलं गेलं. मात्र, एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. आज माझं मन मला सांगतंय की, तसं व्हायला नको होतं,” असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या वेळी या दोन्ही गटांनी आपापले उमेदवार दिले होते. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना तिकीट दिलं होतं. त्यानंतर आता त्यावेळी आपली चूक झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




