पुण्यात खळबळ! व्हायरल व्हिडीओवरुन पोलिसांनी मद्यधुंद चालकाला घेतले ताब्यात

पुणे : रविवार सकाळी ९ वाजण्याची वेळ, कर्वे रोडवरुन एका कार चालक उघडाबंब अवस्थेत गाडी चालवत होता. नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला ताब्यात घेतले. सुदैवाने तत्काळ हा प्रकार समोर आल्याने मोठी दुर्घटना टळली.
रविवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होती. यामुळे पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. त्यासोबत मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होती. त्याचवेळी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कर्वे रोडवरुन कार चालक उघडाबंब अवस्थेत व मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे दिसून आले. एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढून तो पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी येथे धाव घेतली. त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याचे नाव शुभम गुप्ता असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान बंदोबस्तावरील पोलिसांनी ही गाडी पकडून तरुणाला मेडिकलसाठी नेले आहे. त्याने कोठे धडक दिली हे समजले नाही़. कोणी तक्रारदार देण्यास आलेले नाही. पोलिसांकडून याप्रकरणात स्वत:हून गुन्हा नोंदवला जाणार आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




