छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाहन चोरी करणाऱ्या तिघांना अटक…

पुणे (संपादक अकबर शिकीलगार) :- अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली.
शुभम अशोकराव लोंढे (वय २१, रा. आळंदी, पुणे), सचिन समाधान दळवी (वय २३, रा. आळंदी, पुणे), यश शिवाजी भोसले (रा. आळंदी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे दरोडा विरोधी पथकातील पोलीस माहिती काढत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमर कदम, गणेश कोकणे यांना माहिती मिळाली की, चोरीची दुचाकी घेऊन दोघेजण आळंदी बस स्टॉपवर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन शुभम आणि सचिन या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत माहिती काढली असता, ती दुचाकी आळंदी परिसरातून चोरीला गेल्याचे समजले. त्यामुळे दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या तिसऱ्या साथीदारासोबत मिळून १४ दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिसरा साथीदार यश भोसले यालाही अटक केली. तिघांकडून १४ दुचाकी वाहने जप्त केली.
या वाहनांबाबत आळंदी, चिखली, महाळुंगे एमआयडीसी, वाळूंज, लोणी काळभोर, शिक्रापूर, संगमनेर, आळेफाटा पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 12 दुचाकी हिरो स्प्लेंडर कंपनीच्या आहेत.




